About Brahman Sabha Karveer

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आपण एकत्र येऊन आपल्या समाजाकरिता काहीतरी भरीव कार्य केले पाहिजे अशी भावना असे विचार १९४०-१९४१ या काळात बाळसे धरू लागले होते. त्यावेळी काही ब्राह्मण समाजातील अध्वर्यू व विद्वान विचारवंत, मंडळींनी समाज उन्नती व ज्ञातीचा उत्कर्ष व्हावा यासाठी वेदाभ्यास, नंदिनी सभा, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक सभा इत्यादी विविध ज्ञातीसाठी काही समाजाच्या कल्याणाचे उपक्रम राबवत होते. त्यात प्रामुख्याने कै. विश्वनाथराव गोखले, कै. रा ब. पंडितराव, वे. शा. सं. कै. बलाचार्य खुपेरकर शास्त्री, श्री वाकनीस सरदार इ. विद्वान मंडळीनी चालवलेली वेदाभ्यास नंदिनी सभा हि या शास्त्री पंडितांची परीक्षा घेणारे एक विद्यापीठच होते. आपण अधिक समाजाभिमुख झाले पाहिजे हि जाणीव उत्पन्न झाली व प्रथम समस्त ब्राह्मण समाज एका संघटनेखाली आणावयाचा व संघटीत करावयाचा प्रयत्न सुरु झाला. याच वेळी मुंबई गिरगाव ब्राह्मण सभेच्या प्रगतीशील कार्याची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.

कै. श्री. यशवंतराव चिंतामणी गुणे, राजवैद्य श्री. स. ब. कुलकर्णी-दुधगावकर, श्री. माजनाळकर वकील, कै. श्री. हळदीकर वकील, कै. श्री. विष्णू विनायक जोशी वकील, श्री तात्या उमराणीकर इ. धुरिणांनी सर्व ब्राह्मण पोट जातींना एकत्र आणण्याच्या दृष्टीने व अशा प्रकारची एक मध्यवर्ती ब्राह्मण संस्था असावी या दृष्टीने श्री महालक्ष्मी मंदिरातील राम मंदिराच्या माडीवर गणेशोत्सव सुरु केला आणि वर्गणी रूपाने मदत गोळा करून पुढे ३-४ वर्षे हा कार्यक्रम चालला. त्यात प्रामुख्याने कै. श्री. आपटे वकील, श्री रामभाऊ पंडितराव, श्री लिमये, कै. श्री रावसो कुरणे, कै. श्री यशवंतराव गुणे, श्री परांडेकर, श्री बंडोपंत जोशी, श्री कृष्णाजी महादेव अष्टेकर, श्री तात्या उमराणीकर यांचा त्या गणेशोत्सवात प्रामुख्याने सहभाग असे. स्त्रियासाठी हळदीकुंकू समारंभ व पान सुपारी या प्रकारचे कार्यक्रम करून सर्वांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला व सहवासाने सहकार्य व सहकार्याने संघटीत पणे कार्य याप्रमाणे संघटनेची मुहूर्त मेढ रोवली गेली व ब्राह्मण सभेच्या स्थापनेची वाटचाल सुरु झाली. सर्व ब्राह्मण संस्थांच्या कार्यकर्त्यांची सभा कै. श्री. जोशी वकील यांच्या घरी भरली. त्यात घटनेचा मसुदा तयार करून त्यात रीतसर मंजुरी घेनेसाठी सर्व हितचिंतक सभासद मंडळाची पहिली सभा श्रीमंत गुरुमहाराज यांच्या वाड्यात डॉ. अप्पा महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक ०८-१०-१९४३, शके १८६५ विजया दशमी या दिवशी भरली आणि घटनायुक्त ब्राह्मण सभा स्थापन झाली.

सुरवातीस सभासद करून घेण्याचे अवघड काम सुरु झाले. संस्थेची ध्येय धोरणे ठरविली व संस्थेसाठी वास्तू उभा करणे, पारंपारिक धार्मिक व सण उत्सव समारंभ साजरे करणे, शिक्षनोत्तेजक योजना आखणे व संस्कार केंद्रे निर्माण करणे वगैरे कामे करताना सुमारे अडीच ते तीन वर्षाचा काळ कसा गेला कळले नाही या वेळेपर्यंत सभासद संख्या २७५ झाली होती. संस्था सरकार दरबारी नोंद झाली त्यामुळे तिला सर्व थरातून मान्यता मिळू लागली. वेगवेगळे उत्सव व सभा नियमित होऊ लागल्या त्यासाठी संस्थेस जागेची अडचण भासू लागली. श्री लक्ष्मी नारायण मदन गोपाल यांच्या यांच्या श्री रामची माडी सभेस त्यांनी उदार अंतकरणाने वापरण्यास दिली.

सण १९५८ साल उजाडले. संस्थेच्या मालकीची स्वतःची वास्तू असावी अशी मनोमन सर्वांची इच्छा होती. श्री गजानन कृपेने व त्यावेळच्या संचालकाच्या प्रयत्नांना यश आले. आर्थिक अडचणी तर खूपच होती. अनेक संस्था, हितचिंतक, यांचा सहभाग, आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक सभेणे रु.५०००/- कर्हाडे ब्राह्मण संघाने रु. २०००/- ची देणगी दिली म्हणून सदरची जागा घेनेची आशा निर्माण झाली. अनेकांनी आर्थिक देणगी देऊन मदत केली. सर्व व्यवहाराची कागदपत्रे कायदेशीर पूर्ण करून दिनांक ०९/०८/१९५८ कै. भालचंद्र गजानन जोशीराव यांच्याकडून जागा खरेदी ताब्यात घेतली.

याच दिवशी शुभ मुहूर्त समजून सर्वांच्या उपस्थितीत वे. शा. स. पं. श्रीपाद शास्त्री जेरे यांचे प्रवचन आयोजित करून त्या जागेचा शुभारंभ करणेत आला. या कार्यात श्री दादा परांडेकर, श्री आनंदमूर्ती डिग्रजकर, श्री गो. वा. कुलकर्णी, श्री माधवराव सामानगडकर, मिरजेचे श्री गोपाळराव वाटवे, ऑडीटर श्री. डी. वाय. भूमकर, श्री बाबुराव हसबनीस, इ. मान्यवर व्यक्तींचे परिश्रम व तळमळ विशेष उल्लेखनीय आहे. त्यात ही विशेष म्हणजे संस्थेचे त्यावेळचे कार्यवाह श्री आनंदमूर्ती डिग्रजकर यांनी या कामी अविश्रांत परिश्रम घेतले.

इमारतीत अत्यावश्यक दुरुस्ती व फेरफार करून त्यावेळचे सुप्रसिद्ध उद्योगपती व शंकरराव कुलकर्णी मानकापूरकर यांच्या शुभ हस्ते ०६-०२-१९५९ रोजी उदघाटन झाले. व वस्तूचे “मंगलधाम”असे नामकरण झाले.श्री वे. शा. स. श्रीपादशास्त्री जेरे यांचे सुश्राव्य प्रवचन झाले व समारंभाची सांगता झाली. व त्यांच्या मार्गदर्शनाने हा सोहळा पार पडला.

अशा रीतीने संस्थेने सण १९६९ पर्यंत आपली २५ वर्षे पूर्ण करून आपल्या प्रगतीचा टप्पा गाठला. जुने तळमळीचे कार्यकर्ते हळूहळू काळाच्या ओघात कमी होत गेले. त्यामुळे संस्थेची प्रगती थोडी मंदावली. विशेषतः संस्थेचे धडाडीचे माजी कार्यवाह श्री आण्णा गुणे यांचे निधन १९७४ साली झाले. पाठोपाठ माजी उपाध्यक्ष डॉ. ल. ज. नागावकर व त्या वेळचे विद्यमान अध्यक्ष यांचे निधन झाले. व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व थोर तळमळीचे कार्यकर्ते श्री स. ब. कुलकर्णी दुधगावकर-वैद्य यांचे दुःखद निधन झाले. परंतु पुढील तरून कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य जोमात सुरु ठेवले.

नवीन जागेत वसतिगृह बांधण्यास सुरवात केली. सन १९७७-७८ ला त्या जागेचा प्लॅन श्री बेनाडीकर पाटील यांच्याकडून तयार करण्यात घेतला. अनेक अडचणी पार करून दिनांक ०७-०९-१९८९ रोजी श्री वे. शा. सं. पं. जेरेशास्त्री श्री वे. शा. सं. मं. वि. ऊर्फ बंडोपंत धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थीतीत संस्थेचे अध्यक्ष र. ब. सागावकर यांच्या हस्ते धार्मिक विधीने पायाभरणी समारंभ उत्तम प्रकारे साजरा करण्यात आला. या इमारतीचे बांधकामासाठी संस्थेकडे अगदीच कमी रक्कम असलेने कार्यकारी मंडळाने एक ठराव करून व साधारण सभेची मंजुरी घेऊन श्री महालक्ष्मी को. ऑप. बँकेकडून रु. पाच लाख कर्जाऊ घेतले. व इतर हि थोड्या फार देणग्या गोळा केल्या आर्थिक अडचण दूर झाल्यानंतर या इमारतीचे काम पूर्ण झाले.

या इमारतीचा वास्तुशांती व गृहप्रवेश समारंभ दिनांक ११- मे- १९८९ या शुभ दिनी करण्याचे योजिले. व सदर समारंभाची सुरवात संस्थेचे अध्यक्ष र.ब. सांगावकर व त्यांच्या पत्नी सौ पद्मावती यांच्या शुभ हस्ते पुण्याहवाचन विधीने झाली. तसेच या समारंभानिमित्त संस्थेचे संचालक श्री . वा. रा. धर्माधिकारी दांपत्याच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा यथासांग करण्यात आली. वस्तूचे नाव “श्री. स. ब. कुलकर्णी, दुधगावकर वैद्य वसतिगृह”असे नामकरण करण्यात आले.

अमृतमहोत्सवी ब्राह्मण सभा करवीर, मंगलधाम संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व बंधू- भगिनींचे हार्दिक स्वागत.